आज चिपी विमानतळाचं उद्घाटन; राणे- ठाकरे एकाच व्यासपीठावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोकणवासीयांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सिंधुदुर्गातील नव्या ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु होत आहे. आज दुपारी 12.30 वाजता या विमानतळाचे उद्घाटन होणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्मंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब असे दिग्गज नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणातील कट्टर विरोधक असलेले नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार आहे. मधल्या काळात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शिवसेना भाजप मध्ये संबंध अजून ताणले होते. तसेच निमंत्रण पत्रिकेत नारायण राणे यांचे नाव तिसऱ्या स्थानी लिहिलं होतं, शिवाय हे नाव दोन्ही नेत्यांच्या नावाहून लहान आकारात छापण्यात आल्याचे सांगत नारायण राणे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ही कोती मनोवृत्ती असल्याचे राणे यांनी म्हटले असले तरी देखील कोणताही वाद होईल असे वक्तव्य राणे यांनी टाळले आहे. यामुळे आज दोन्ही नेते नेमकं काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.

विमानतळाला चिपी नाव का?

या विमानतळाचा उल्लेख चिपी परुळे विमानतळ असा केला जाणार आहे. यामागचे कारण म्हणजे हे विमानतळ उभे राहिलेय ते परुळे गावातील ‘चिपी वाडी’मध्ये. चिपी म्हणजे परुळे गावचाच एक भाग. पूर्वी चिपी हे एक पठार होते. आता याच भागातून विमानाचे उड्डाण होताना दिसणार आहे.