Sunday, February 5, 2023

…अन्यथा माझ्यावर अंत्यसंस्कार करा; मनपासमोर युवक चढला झाडावर

- Advertisement -

औरंगाबाद – समतानगरातील नागरी समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. आठ) एका युवकाने महापालिका मुख्यालयालगत असलेल्या निंबाच्या झाडावर चढून आंदोलन केले. वॉर्डाचा विकास करा किंवा माझ्यावर अंत्यसंस्कार करा, असे म्हणत त्याने झाडावरच उपोषण सुरू केले. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी धाव घेत तरुणांची समजूत काढली व तरुण झाडावरून खाली उतरला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

याविषयी अधिक माहिती अशी की, फारुकी नजोरोद्दीन एकबालोद्दीन असे तरुणाचे नाव आहे. तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. फारुकी नजरोद्दीन याने वॉर्ड क्रमांक ६७ समतानगरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला वारंवार निवेदने दिले होते. मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्याने दोन दिवसांपूर्वी उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान, फारुकी याने शुक्रवारी सकाळी थेट मुख्यालय गाठत प्रवेशद्वाराजवळील निंबाच्या झाडावर चढून आंदोलन सुरू केले. झाडावर बॅनर लावून त्याने जोरदार घोषणाबाजी केली. त्याला सुरक्षारक्षकांनीही उतरण्याची विनंती केली. पण जोपर्यंत वॉर्डातील समस्या सुटणार नाहीत, तोपर्यंत खाली उतरणार नाही. झाडावरून उडी घेत आत्महत्या करेन, असा इशारा त्याने दिला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी त्याला विनंती करत समतानगर वॉर्डाच्या अभियंत्यांसह इतरांना बोलावून घेतले. त्यानंतर सर्व समस्या सोडवण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. यानंतर फारुकीला क्रेनद्वारे खाली उतरवण्यात आले.

- Advertisement -

हा तरुण झाडावर चढला हे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात कसे आले नाही, याविषयी सुरक्षा विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे श्री. निकम यांनी सांगितले. फारुकी याने दिलेल्‍या निवेदनात रस्त्यांची कामे करण्यात यावीत, मुबलक पाणी मिळावे, ड्रेनेजलाइन ठिकठिकाणी चोकअप होऊन रस्त्यांवरून पाणी वाहते आहे, त्यामुळे दुरुस्ती करावी, आदी मागण्या केल्या आहेत.