औरंगाबाद – कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा शहरात आज पासून सुरू होणार आहेत. शहरात शासकीय आणि खासगी अशा 746 शाळांची घंटा वाजणार आहे. विशेष म्हणजे तब्बल वीस महिन्यानंतर शाळांमध्ये पुन्हा एकदा बच्चेकंपनीचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे.
मनपा प्रशासन अस्तिक कुमार पांडे यांच्या आदेशानुसार शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून एक समिती गठीत करण्यात आली आहे. शहरात पहिली ते सातवीचे 2 लाख 797 विद्यार्थी आहेत. यापैकी मनपा शाळांत 10 हजार 915 विद्यार्थी आहेत. मनपाच्या सर्व शाळांचे सनिटेशन व स्वच्छता करण्यात आल्याची माहिती समर्ग शिक्षा अभियानाचे ज्ञानदेव सांगळे यांनी दिली आहे. मनपाच्या सर्व शिक्षकांचे लसीकरण झाले आहे खासगी शाळांमधील सुमारे 80 टक्के शिक्षकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे.
काय आहेत नियम –
– पालकांचे संमतीपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार प्रवेश
– संमती पत्र नसल्यास त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणार
– शाळेत येताना मास्क, सॅनिटायझर आवश्यक
– लस घेतलेल्या शिक्षकांना शाळेत प्रवेश
– ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर आजपासून शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा राहणार आहे सोमवार ते शुक्रवार शाळा भरणार असून शनिवारी रविवारी सुट्टी असेल