बोगस कागदपत्र बनवून कोट्यवधींची जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दलालांच्या टोळीला नागरिकांकडून बेदम चोप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरज तालुक्यातील कवलापूर गावच्या हद्दीत असणाऱ्या मोक्याची व कोट्यवधी रुपयांची दोन एकर जमीन मूळ मालकाला कोणतीही कल्पना न देता परस्पर बोगस ओळखपत्र आणि कागद तयार करून विक्री करण्यात येत होती. सदरची माहिती मूळ मालकाच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी थेट सांगलीतल्या नोंदणी कार्यालयात धडक देत पाच जणांच्या टोळीला पकडले. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी यावेळी तिघांना पकडून बेदम चोप दिला. नातेवाईकांचा रौद्रावतार बांधून दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

घटनेची माहिती मिळताच मोठी गर्दी याठिकाणी झाली होती. अखेर नातेवाईकांनी चोप देत या तिघांची सांगली शहर पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी निवृत्ती सीताराम हरगुडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून सलीम बाळू मुलाणी, अक्षय अनिल शिंदे, राहुल काशीद गंगाधर, विजय राजाराम माने आणि मनोज दशरथ निकम या पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

मिरज तालुक्यातील कवलापूर गावच्या हद्दीत तासगाव रोडवर गॅस गोडाऊनजवळ निवृत्ती सीताराम हारुगडे यांच्या मालकीची दोन एकर जमीन आहे. ही जमीन अनेक वर्षांपासून मोकळी आहे. इचलकरंजी येथील एका एजंटची नजर या मोक्याच्या जागेवर पडली. त्याने या जमिनीचा सातबारा उतारा काढला. एक ग्राहक शोधून मूळ मालकाच्या जागी एक बोगस व्यक्ती उभा केली. हारुगडे यांच्या नावाने बोगस रेशन कार्ड आणि आधारकार्ड तयार केले. सदरच्या जमिनीचे खरेदीपत्र करण्यासाठी आज दुपारी पाच जण सांगलीतील जुन्या राजवाडा चौकात असलेल्या नोंदणी कार्यालयात पोहचले होते.

याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला हरुगुडे यांच्या कागदपत्रांबद्दल संशय आला. त्याने थेट हारुगडे यांचा पुतण्या मारुती हारुगडे यांना फोन करून, तुमच्या चुलत्यांच्या जमिनीची विक्री सुरू असल्याचे सांगितले. बोगसगिरीचा प्रकार लक्षात येताच मारुती हरुगुडे हे काही मित्रांसह सांगलीतील नोंदणी कार्यालयात पोहचले. याचवेळी निवृत्ती हरुगडे यांच्या जमिनीची परस्पर विक्री करणारे पाच जण आढळले. मारुती हरुगडे यांनी जमीन विक्री करणाऱ्या टोळीतले निवृत्ती हरुगडे यांच्याबद्दल विचारणा केली. त्यावर दोघांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस येताच मारूती हरुगुडे आणि त्याच्या मित्रांनी संबंधित टोळीतील तिघांना पकडून बेदम चोप दिला.