हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतातच नाही तर परदेशात सुद्धा जल्लोषात गणेशोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीमधील एर्लांगन शहरात ढोलताशांच्या गजरात एकदिवसीय गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने गणेश पूजन, महाआरती, विसर्जन मिरवणूक आदी कार्यक्रम पार पडले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्रातून नोकरी निमित्त जर्मनीत स्थायी असणाऱ्या तरुण तरुणींनी पुढाकार घेतला. यामध्ये कराड तालुक्यातील कोले गावचा युवक अमोल कांबळे याचाही समावेश होता.
मराठी विश्व फ्रांकेंनच्या संस्थापिका अकोल्याच्या रश्मी गावंडे, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोळे गावचे अमोल कांबळे, औरंगाबादचे प्रशांत गुळस्कर नागपूरच्या तृप्ती सपकाळ यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे यावेळी पार पडलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत जर्मनीकरांनी सहभागी होत ठेका धरला.
यंदाच्या वर्षी मराठी विश्व फ्रांकेन आणि ICF च्या वतीने जर्मनीतील एर्लांगन शहरात गणेशोत्सव थाटात साजरा करण्यात आला. यावेळी जर्मनीत कामानिमित्त स्थायी असलेल्या भारतीय नागरिकांनी गणेश मूर्ती स्थापना, ढोलताशा, लेझिम, दंडप्रहार संचालन आदींचे सादरीकरण केले. दरम्यान, गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने गणेश पूजन, षडोपचार, महाआरती, विसर्जन मिरवणूक आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी दंडप्रहार अभ्यासासाठी अशोक सोनटक्के, लेझीम सरावसाठी रश्मी गावंडे व रसिका कुलकर्णी, सजावटसाठी ज्योत्स्ना पाटील व व्यवस्थेसाठी आशा रमेश व रमेश रमानुजम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत जर्मनीकरांनी धरला ठेका; कराडच्या कोळे गावच्या युवकाचा पुढाकार pic.twitter.com/JDC0N7GChV
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 26, 2023
भारतीय तरुण आणि तरुणींकडून आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव कार्यक्रमात जर्मन नागरिकांना देखील सहभागी होत आनंद लुटला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारतीय तरुणांनी आपली भारतीय परंपरा, संस्कृती परदेशात सुद्धा जिवंत ठेवल्याचे पहायला मिळाले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून ऐतिहासिक वेषभूषेतून सादर केले देखावे, लेझीम नृत्य तसेच दांडपट्टा आदींची जर्मनीकरांकडून देखगील माहिती घेतली जात होती.
लहान मुलांनी घेतला गणेशमूर्तीच्या हस्तकला व वेशभूषा स्पर्धेत सहभाग
यावेळी जर्मनीतील लहान मुलांसाठी गणपती मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देखील आयोजित केले. यावेळी लहान मुलांनी त्यामध्ये सहभागी होत आकर्षक मूर्ती देखील बनवल्या. त्यानंतर पारंपरिक वेशभूषा स्पर्धांचे आयोजण करण्यात आले. यावेळी लहान मुलांनी गणपती, विठ्ठल रुक्मिणी, वारकरी, छ.शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक अशा थोर महापुरुषांची वेशभूषा करून सहभाग घेतला.