कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाबळेश्वरमध्ये पहिले ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन मालकम यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या माउंट मालकम या मिळकतीची हेरिटेज ग्रेड बदलण्यास विरोध केलेल्या नागरीकांच्या हरकतींची सुनावणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यासमोर सुरू झाल्या असुन या सुनावणी दरम्यान अनेक नागरीकांनी मिळकतीचा हेरिटेज दर्जा बदलण्यास तिव्र विरोध केला आहे. ब्रिटीशांनी वसविलेले शहर म्हणुन महाबळेश्वर या थंड हेवच्या ठिकाणीची ओळख आहे.
शहराच्या सर्वांत उंच असलेल्या विल्सन पॉईंटच्या पायथ्याला उदयोगपती अविनाश भोसले यांचा फोर ओक्स हा बंगला आहे. या बंगल्या समोर ब्रिटिश गव्हर्नर मालकम यांचा माउंट मालकम हा बंगला आहे. अलिकडेच या मिळकतीचा व्यवहार झाला. ही मिळकत आता मेक व्हयुव सी रिसॉर्ट प्रा. लि या कंपनीच्या नावे आहे. या ठिकाणी असलेला जुना बंगला पाडुन तेथे नविन रिसॉर्ट बांधण्यासाठी बांधकाम आराखडा मिळकत धारकांनी सादर केला आहे. परंतु बांधकाम आराखडा मंजुर झाला नाही कारण माउंट मालकम ही मिळकत हेरिटेज यादीच्या 2(अ) या यादीत आहे. हेरिटेज 3 यादीत असलेल्या मिळकती मध्येच केवळ बांधकाम परवानगी मिळते, म्हणुन मिळकत धारकाने माउंट मालकम या मिळकतीची हेरिटेज दर्जा बदलुन मिळावा अशी मागणी हेरिटेज समितीकडे केली आहे.
हेरिटेज दर्जा बदलण्यासाठी नागरीकांच्या सुचना व हरकती विचारात घ्याव्या लागतात म्हणुन हेरिटेज समितीने जानेवारी मध्ये वर्तमान पत्रात निवेदन देवुन नागरीकांच्या हरकती मागविल्या होत्या. जानेवारीमध्ये आलेल्या हरकतींची सुनावणी पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या दालनात या सुनावण्या घेण्यात येत आहेत. या सुनावणी दरम्यान अनेक नागरीकांनी अशा प्रकारे माउंट मालकम या मिळकतीचा हेरिटेज दर्जा बदलण्यास विरोध केला आहे.
महाबळेश्वरच्या बाजार पेठेत एकही ब्रिटिश कालिन वास्तु नाही. तरी देखिल महाबळेश्वरची बाजारपेठ ही हेरिटेज यादीत समाविष्ठ करण्यात आली आहे. बाजार पेठेतील मिळकत धारकांना त्यामुळे बांधकाम परवानगी मिळविताना खुप कष्ट घ्यावे लागतात. हेरिटेज समिती सदस्यांचे उंबरे झिजवावे लागतात. बाजारपेठ हेरिटेज यादीतुन वगळण्यात यावी अशी मागणी गेली अनेक वर्षा पासुन महाबळेश्वरचे नागरीक करीत आहेत. परंतु त्या मागणीकडे लक्ष देण्यास हेरिटेज समितीस वेळ नाही मात्र धनिकांच्या मागणीला प्राधान्य देवुन दर्जा बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने शहरात हेरिटेज समितीच्या कारभारा बाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पहीला ब्रिटीश गव्हर्नर असलेल्या सर जॉन मालकम यांचा बंगला हा वास्तु कलेचा उत्तम नमुना होता. परंतु देखभाल दुरूस्ती अभावी या बंगल्याची पडझड झाली आहे. मिळकत धारकांनी वेळोवेळी देखभाल दुरूस्ती केली असती तर हा बंगला मोडकळीस आला नसता म्हणुन या पडझडीस मिळकत धारकांस जबाबदार धरून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांनी केली आहे. नागरीकांचा विरोध असताना आता हेरिटेज समिती माउंट मालकम या बंगल्या बाबत काय निर्णय घेणार या कडे शहराचे लक्ष लागुन राहीले आहे.