मानवी कवटीचे प्रकरण सिव्हिल हाॅस्पीटल आणि पोलिस दडपत आहेत : सुशांत मोरेंचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

‘मानवी कवटी’ बाबत सिव्हिल आणि पोलीस प्रशासन हातात हात घालून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष घालून चौकशीचे आदेश देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केलेली आहे.

सातारा जिल्हा रुग्णालयात ‘मानवी कवटी’ आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सदरची बाब गंभीर असून देखील याबाबत जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी या घटनेबाबत हात झटकले आहेत. मानवी कवटी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेला व्हिडिओ समोर आला आहे. पोलीस यंत्रणा आणि सिव्हिल प्रशासन हातात हात घालून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली असून जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचे सांगितले आहे.

या मानवी कवटीबाबत शहरात वेगवेगळी चर्चा सुरू आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी कोणतीही कवटी रूग्णालयाच्या आवारात आढळून आली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच जिथे ही कवटी सापडली तेथे जावून पाहणी केली असता तेथेही कवटी नव्हती, असे सांगितले.