नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आपण आजपर्यंत लहान मुलांची भांडणे झालेली पाहिली असतील. पण जर शाळेतील शिक्षकांची भांडणे झाली तर? असाच काहीसा प्रकार नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात घडला आहे. यामध्ये विद्यार्थी नव्हे तर चक्क शिक्षकांनीच शाळेतील पोरांसारखे भांडण केले आहे. या भांडणांमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा चावा घेतला आहे. शिक्षक-मुख्याध्यापकाच्या या वादाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
येवला तालुक्यातील नगरसुल येथील शिक्षण प्रसारक मंडळ या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आहे. यामध्ये शालेय कॅटलॉक संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकामध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला. यानंतर हा वाद एवढा वाढला कि शाळेच्या मुख्याध्यापकांनी थेट शिक्षकाच्या अंगठ्याचा चावा घेतला. सुरेश अहिरे असे मुख्याध्यापकाचे नाव असून ब्रह्मचैतन्य राजगुरू असे जखमी शिक्षकाचे नाव आहे.
मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल
मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यातील हे भांडण थेट पोलिसांपर्यंत गेले आहे. जखमी शिक्षक ब्रह्मचैतन्य राजगुरू यांनी मुख्याध्यापक सुरेश अहिरे यांच्याविरोधात येवला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येवला पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.