Saturday, June 3, 2023

ढगफुटी : सातारा जिल्ह्यातील गुरे चारण्यासाठी गेलेली महिला पाण्यातून वाहून गेली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा तालुक्यातील मांडवे येथील ओढ्याला पूर आल्यामुळे गुरे चारण्यासाठी गेलेली महिला वाहून गेल्याची घटना शनिवारी 5 जून रोजी संध्याकाळी घडली आहे. काही काळ झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने आलेल्या पुरातून पुतळाबाई सुधाकर माने (वय- 70) असे वाहून गेलेल्या महिलेचे नांव आहे.

सातारा जिल्ह्यात कराड, पाटण, महाबळेश्वर, पाचगणी, वाई या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. या पावसामध्ये सातारा तालुक्यातील मांडवे गावात मोठी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. अचानक झालेल्या या मोठ्या पावसामुळे या परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आला होता. या ढगफुटीमुळे परिसरातल्या सर्व विहिरी तुडूंब भरून वाहत होत्या. ओढ्यालगत असलेल्या रस्त्यावरून जात असताना एक वयोवृद्ध महिला ही ओढ्यात वाहून गेली. या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ हे घटनास्थळी गेले. मांडवे ग्रामस्थांच्या मदतीने ते सागर वाघ यांनी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत या महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू होते. मात्र महिला मिळून आली नाही.

एका बाजूला मांडवेमध्ये अशी परिस्थिती झाली असताना दुसरीकडे खटाव तालुक्यातील वर्धनगड भागातही ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. झालेल्या पावसाने घाट माथ्यावरती असलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पूर्णपणे वाहतूक थांबवण्यात आली होती. नदीला पूर दिसावा तशी परिस्थिती या घाटाच्या परिसरामध्ये झालेली होती. या पावसात अनेकांच्या घरांत मोठे नुकसान झालेला आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागातही काही काळ पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी सणबूर, उधवणे आणि वाल्मिकी परिसरात पेरणीची कामे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.