हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शिंदे साहेब, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो अशी खुली ऑफर देणाऱ्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिमटे काढत प्रत्युत्तर दिले आहे. जयंतराव, मला मुख्यमंत्री करण्याबाबत तुम्ही अजितदादांना विचारलं आहे का? असा खोचक सवाल त्यांनी केला. तसेच तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का असं म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केला.
राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषण जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांच्या कालच्या भाषणाचा समाचार घेतला. जयंतराव, तुम्ही मला मुख्यमंत्री करणार होता, पण याबाबत अजितदादांना विचारलं आहे का ? तुम्हाला विरोधी पक्षनेते व्हायचे होते, ते तरी तुम्ही झाला का ? असा सवाल करत शिंदेनी जयंत पाटील याना डिवचले. अजितदादा हे शेवटी दादा आहेत, त्यांची दादागिरी कायम चलेगी असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कंत्राटी कामगार या उल्लेखाचाही समाचार घेतला. असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा असा टोला त्यांनी लगावला. तसेच होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे, पण बाळासाहेबांचे हिंदुत्त्वाचे विचार पुढे घेऊन जायचे कंत्राट मी घेतले आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे कंत्राट मी घेतले आहे. राज्य अधिक समृद्ध करण्याचे कंत्राट मी घेतले आहे. गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे आणि जनतेचे अश्रू फुटण्याचे कंत्राट मी घेतले आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचे दुःख दूर करण्याचे कंत्राट मी घेतले आहे आणि बहुजनांच्या सर्वांगींन विकासाचे कंत्राट मी घेतले आहे. अशा शब्दात शिंदेनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.