हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याची कल्पनाच नाही. मुख्यमंत्र्यांनी पीपीई किट घालून फिरावं म्हणजे त्यांना वास्तवाची जाणीव होईल, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवाताडे यांचा प्रचार करण्यासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा सल्ला दिला. मुंबईची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ढासळलेली आहे. आम्हाला या लॉकडाऊनमध्ये कुठेही राजकारण करायचे नाही. आम्ही या लॉकडाऊनमध्ये सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. पण आता मुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा केल्यास त्यांनाही राज्यातील भीषण स्थिती समजू शकेल, त्यामुळे त्यांनी राज्यात फिरावे व राज्यातील विदारक स्थिती समजावून घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना करीत आहोत, असे पाटील म्हणाले.
सध्याचे मुख्यमंत्री फक्त एका पक्षाचेच प्रमुख असल्यासारखे वागतात. शरद पवार साहेबांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री बनविले व स्वत: सरकारच्या बाहेर राहिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. कदाचित म्हणूनच त्यांनी ऑक्सिजन हे विमानाने आणण्याबाबत काल भाष्य केले, असं सांगतानाच महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था सरकारला करावी लागेल. ऑक्सिजन असो वा रेमडेसिवीर इंजेक्शन किंवा व्हेंटिलेटर असू दे जोपर्यंत मुख्यमंत्री स्वत: पीपीई किट घालून बाहेर फिरत नाहीत तोपर्यंत नेमके काय सुरु आहे हे मुख्यमंत्र्यांना कळणार नाही, असंही ते म्हणाले.