हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून राज्यातील जनतेपुढे संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेली मागणी मान्य करून अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.
परराज्यातून येणाऱ्यांची नोंदणी ठेवा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेआधी तसं काही झालं नाही. आता कोरोनाची लाट आली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. त्यामुळे ही लाट ओसरल्यावर मजुर पुन्हा येतील. याच पार्श्वभूमीवर आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, असं उद्धव ठाकरेे म्हणाले.
याबाबत मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई म्हणाले की, राजसाहेब जेव्हा सरकारला एखादी सूचना करतात तेव्हा ती महाराष्ट्राच्या हिताचीच असते. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंदणी करा अशी सूचना राज ठाकरेंनी केली होती. पण त्याचे राजकारण केले गेले. मात्र आज जेव्हा परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. तेव्हा सरकारला स्वत:ची चूक कळली आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना परप्रांतीय मजुरांची नोंदणी व आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले असं त्यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.