मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांच हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं आहे. शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असतानाच राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसेच राज्याचे केंद्राकडे 38 हजार कोटी थकीत असून केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं म्हटलं आहे.

सरकारच्या आतापर्यंतच्या पाहणीत राज्यभरातील जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘एसडीआरएफ’च्या निकषांनुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकासआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति दोन हेक्टरसाठी 6500 रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.

साधारणपणे ऑक्टोबर 2019 पासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 30 हजार 800 कोटी रुपये दिले. यात कर्जमुक्तीचाही समावेश आहे. ९ हजार ८०० कोटी विविध नैसर्गिक आपत्तींसाठी दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करु. सध्या परिस्थिती कठीण असून राज्याकडेही पैसा नाही. पण अशा स्थितीतही राज्य शेतकऱ्यांना मदत करत आहे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

केंद्राच्या नियमानुसार बागायती आणि कोरडवाहूसाठी ६ हजार ८०० रुपये दिले जाऊ शकतात. पण आम्ही हेक्टरी १० हजार रुपये मदत देणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तर फळबागांसाठी १८ हजार प्रति हेक्टर ही केंद्राच्या नियमानुसार, पण राज्य सरकार २५ हजार प्रति हेक्टर मदत करणार, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’