हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 3-4 दिवसांत मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, महाड आणि चिपळूण या कोकण भागात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली. चिपळूण मध्ये तर महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला जाऊन पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. यानंतर मुख्यमंत्री पूरग्रस्तांसाठी आर्थिक घोषणा कधी करणार असा प्रश्न विचारले असता उद्धव ठाकरेंनी स्पष्टच उत्तर दिले.
केवळ सवंग लोकप्रियतेसाठी कोणत्याही पॅकेजची घोषणा मी करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात घोषणा करण्यात येईल. मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचना देखील मी प्रशासनाला केल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून आपणास व्यवस्थित मदत मिळत आहे. माझे पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्याशी बोलणं झालं आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा यांचा एकत्रिच आढावा घेऊन तात्काळ मदत घोषित करु. रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. मोठं नुकसान झालं आहे. पिकांचं नुकसान झालं आहे. सर्वांचा एकत्रित आढावा घेऊन जे शक्य होईल जे आवश्यक आहे ते सगळे पुरवले जाईल”, असं मुख्यमंत्री म्हणाले.