..अन उद्धव ठाकरेंना फोटो काढण्याचा आवरला नाही मोह; लोणार सरोवराचे सौंदर्य टिपले मोबाईलने

बुलढाणा । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आज बुलडाणा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी जगविख्यात लोणार सरोवराची पाहणी केली. सकाळच्या प्रसन्न वातावरणात लोणार सरोवराचे (Lonar Lake) अत्यंत विलोभनीय सौंदर्य पाहून उद्धव ठाकरेंना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. आणि त्यांनी आपला मोबाईल काढत लोणार सरोवराचे रमणीय दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपले.

उद्धव ठाकरेंचे फोटोग्राफीवरील सर्वश्रुत आहे. राजकीय व्यक्ती व्यतिरिक्त त्यांची उत्तम फोटोग्राफर म्हणून ओळख आहे. उद्धव ठाकरे यांनी 2004 साली देखील लोणार सरोवराला भेट दिली होती.  तेव्हा देखील त्यांनी लोणार सरोवराचे काही फोटो आपल्या कॅमेरात कैद केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी साडे नऊच्या दरम्यान लोणार सरोवरावर पोहोचले. यावेळी वनकुटी येथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लोणार सरोवराच्या व्ह्यू पॉईंटवरुन मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. सरोवरातील गायमुख या ठिकाणी पाहणी करीत त्यांनी सरोवराचे अवलोकन केले.

यावेळी त्यांच्यासोबत बुलडाण्याचे पालकमंत्री, प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते. लोणार सरोवराविषयी अधिकारी मुख्यमंत्र्यांना माहिती देत होते. लोणार सरोवराची पाहणी केल्यानंतर आणि लोणार विषयीची बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे औरंगाबादकडे प्रयाण करतील. औरंगाबादच्या नामांतरावरुन सध्या राजकारण तापलेलं आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा महत्त्वाचा मानला जातोय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like