हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढल्याचे दिसत आहे. दिल्ली, मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती दिली आहे.
‘कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाल यांच्याशी सातत्यानं बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रात लसीकरण कशाप्रकारे करावं, लसीचं वितरण यासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. pic.twitter.com/1FZUexTlRF
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 24, 2020
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. 100 देशांच्या राजदूतांच्या दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. 100 देशांचे राजदूत 27 नोव्हेंबरला पुण्यात दाखल होतील. त्याबाबत प्रशासनाला दौरा प्राप्त झाला आहे. तर 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’