हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संघर्ष करत असताना संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तो खरा नेता असतो. फक्त आदळआपट करणं याला मी नेतृत्व म्हणत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापुरात सारथी संस्थेच्या उपकेंद्राचा शुभारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाचं संकट केवळ महाराष्ट्रावर नव्हे, तर जगावर आहे. आरक्षणाचा प्रश्न समोर आहे हे मान्य आहे. पण संघर्षाला रस्त्यावर उतरायचं, न्यायहक्कासाठी गर्दी करायची आणि जे संकट आहे तेच संकट घरोघरी पोहोचवायचं हे काही नेतृत्वाचं लक्षण नाही. खरा नेता तोच आहे जो समाजाचं रक्षण चहुबाजुंनी करतो.
आर्थिक आरक्षण, राजकीय आरक्षण, नोकरीत आरक्षण हा जसा न्यायहक्क आहे. तसा समाजाच्या आरोग्याची चिंता वाहणारा नेता पाहिजे. गर्दी केली, ताकद दाखवली नंतर साथ पसरली तर ते काही योग्य होणार नाही. त्यामुळे संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायचा हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.