हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो अस ते म्हणाले. तसेच आरेमध्ये कारशेड होणार नाही असही त्यांनी सांगितले. कोरोना काळात गरीब जनतेला शिवभोजन थाळीचा सर्वाधिक फायदा झाला, अस उद्धव ठाकरे म्हणाले.
आजपर्तंयत २ कोटी २ लाख शिवभोजन थाळ्या वितरीत झाल्या
मुख्यमंत्री म्हणाले, “शिवभोजन थाळी ही मूळ योजना १० रुपयांत थाळी अशी होती, ती करोनाच्या काळात आपण ५ रुपयांत थाळी अशी केली. या पाच रुपयांत थाळीचा अनेकांनी लाभ घेतला, करोनाचा काळ सुरु झाल्यापासून आजपर्तंयत २ कोटी २ लाख थाळ्या वितरीत झाल्या आहेत.”
कोरोना या पाहुण्याला दिली ओसरी, पाहुणा हातपाय पसरी
करोना हा पाहुणा जायला काही तयार नाही. या पाहुण्याला दिली ओसरी, पाहुणा हातपाय पसरी अशी परिस्थिती होती. मात्र, आता रुग्णसंख्या कमी होत आहेत. १२ लाख ५५ हजार ७७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ४० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन ते सव्वादोन हजार रुग्ण व्हेंटिलेटर, ऑक्सिजनवर आहेत. ७० ते ८० टक्के रुग्ण सौम्य लक्षणाचे आहेत. तुम्ही खबरदारी घ्या, जबाबदारी आम्ही घेतो, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले.
आरेमध्ये कारशेड होणार नाही
आरेमध्ये कारशेड होणार नसून आरे कारशेड कांजुरमार्ग येथे हलविणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. आरे कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे सरकारने मागे घेतले आहे.
आरेतील जागा जंगल घोषित केली आहे. आधी 600 एकर जागेची घोषणा केली होती. आता या जागेची व्याप्ती वाढवली असून 800 एकरची व्याप्ती करण्यात आली आहे. आता मुंबईत 800 एकराचे जंगल असणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, आरेचे जंगल टिकवणे आपले काम आहे. ते टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
…तर शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पाडणारं कृषी धोरण स्वीकारणार नाही
मुख्यमंत्री म्हणाले की, या कृषी कायद्यांचे फायदे काय आहेत? त्याचे आपल्याला होणारे तोटे काय आहेत? याबाबत अभ्यास सुरु आहे. सदर कायद्यांबाबत लोकांकडून काही सूचना येत आहेत, तर त्यातील काय बाबींवर शेतकरी संघटनांचा आक्षेप आहे. त्यामुळे कृषी कायद्यांच्या अनुषंगाने राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलून, त्याचा पूर्ण अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल.
कृषी कायदा चांगला असेल तर आम्ही तो स्वीकारू, हा कायदा शेतकऱ्यांसाठी चांगला नसेल तर तो जसाच्या तसा स्वीकारणार नाही. शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पाडणारा कायदा स्वीकारणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’