हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली . हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सध्या मी नेमकी किती मदत करायची याची माहिती गोळा करत आहे. ही माहिती उपलब्ध झाली की शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल. शेतकऱ्यांना नाराज करणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
उद्धव ठाकरे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांना आश्वस्त केले. हे सरकार शेतकऱ्यांचं आणि जनतेचं आहे. त्यामुळे सरकार तुम्हाला नाराज करणार नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सध्या किती मदत करायची ही माहिती आम्ही गोळा करत आहोत. ही माहिती उपलब्ध झाल्यावर आम्ही त्यावर अभ्यास करत बसणार नाही. तात्काळ मदत जाहीर करू. येत्या तीन-चार दिवसांतील दौऱ्यानंतर किती मदत करायची याचा साधारण अंदाज येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मदत मागू, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मला यावरुन कोणतेही राजकारण करायचे नाही. मात्र, केंद्र सरकारने राज्याची देणी थकवली आहेत. ते पैसे मिळाले असते तर केंद्र सरकारकडे हात पसरावे लागले नसते. राज्यातील विरोधी पक्षांनी यावरुन राजकारण करु नये. कधीकाळी आपणही सत्तेत होतो, याचे भान विरोधी पक्षाने ठेवावे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’