आम्हीही नको ती अंडी उबवली, पुढे काय झालं ते तुम्ही बघताय; मुख्यमंत्र्यांची बारामतीत फटकेबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी करत भाजपवर निशाणा साधला. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही बघत आहात अस म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.

इन्क्युबेशन सेंटर उभारणारी संस्था तरुणांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचं काम करते. हे काम खूप आव्हानात्मक आणि मोठं आहे. इन्क्युबेशन सेंटरला मराठीत उबवण्याचं केंद्र म्हणतात. आम्हीदेखील २५ वर्षे हे सेंटर चालवलं. त्यात नको ती अंडी उबवली. त्यांचं पुढे काय झालं ते तुम्ही पाहिलंत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपला डिवचले.

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबियांचे कौतुक केले. शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला आणि अजूनही ते थांबायला तयार नाहीत. पवार साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत, पवार कुटुंब विकासाच्या ध्यासात रमलंय. विकास, विकास आणि विकासाच्या पुढे विकास”, सगळे पवार कुटुंबीय अत्यंत मनापासून काम करतायत.असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.