हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू केला. हे करताना त्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत,” अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली
चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले. त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रति कुटुंब केवळ 105 रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. राज्य सरकारने या कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली तरी प्रत्यक्षात प्रती कुटुंब 105 रुपयांचाच भार सोसलेला आहे. रिक्षाचालक साधारणपणे दरमहा सरासरी 10 हजार रुपये कमवत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या आहेत.”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, सर्व काळजी घेऊन शक्य ते उद्योगधंदे चालू ठेवण्यास परवानगी देत आहे. परंतु, त्यांनी व्यापाराविषयी काहीही उल्लेख केला नाही. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचा आदेश असल्याने त्याचा जबरदस्त फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. खरे तर पुरेशी काळजी घेऊन व्यापाऱ्यांना काम करण्याची परवानगी द्यायला हवी होती. केवळ निर्बंध लादायचे आणि फारशी मदतही करायची नाही या महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे कुटुंबे उध्वस्त होण्याची भीती आहे,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.