हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. मात्र अद्याप राज्यातील निर्बंध हटवण्यात आली नसल्याचे सीएमओ कार्यालयाने स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील गोंधळ पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे.
काय आहे सीएमओचे ट्विट
राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. यापुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत आहेत. यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असं राज्य सरकारने सांगितलं आहे.
राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. #BreakTheChain अंतर्गत काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. pic.twitter.com/ZiXbhlMgAK
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 3, 2021
राज्यात टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार होणार. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय होणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले.
वडेट्टीवार नक्की काय म्हणाले-
राज्यात लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 लेव्हल ठरवल्या आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील, असं वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.




