हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा पोलिस मुख्यालयातील अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांची आज मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथे बदली करण्यात आली. तसेच त्यांच्या जागी आता आंचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साताऱ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे दलाल यांना दुसऱ्यांदा साताऱ्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे दलाल या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पत्नी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील अप्परपोलीस अधीक्षक बापू बांगर याची आज बदली करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले. तर त्यांच्याजागी आंचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली. त्या साताऱ्यात सहायक पोलिस अधीक्षक म्हणून पूर्वी कार्यरत होत्या. वर्षभरापूर्वी त्यांची सांगली येथे बदली झाली होती. आता पुन्हा त्या साताऱ्यात येत असून, अपर पोलिस अधीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.
साताऱ्यात असताना त्यांनी जुगाऱ्यांवर धडक कारवाया केल्या होत्या. तसेच महाविद्यालय परिसरात होणारे छेडछाडीचे प्रकारही त्यांनी आटोक्यात आणले होते. साताऱ्यात त्यांना कामाचा चांगला अनुभव असल्यामुळे पुन्हा एकदा त्या नव्या जोमाने धडाकेबाज कामगिरी करतील, अशी अपेक्षा सातारकरांना आहे.