कलेक्टर साहेब ! कडक निर्बंध मोडणाऱ्यांवर कारवाई कोण करणार?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात व्यापारी दुकाने बंद ठेवली असून अनेक ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आले असल्याचे तुमचे आदेशही लोकांनी पाहिले. तसेच कडक निर्बंधांचे कडक आदेश मोडल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही वाचले. मात्र आता व्यापारी दुकाने बंद तरीही रस्त्यांवर तोबा गर्दी असताना व ज्या गोष्टी चालू आहेत, त्याच्यांकडून कडक निर्बंध दिवसाढवळ्या मोडले जात आहेत. तेव्हा कलेक्टर साहेब ! कडक निर्बंध मोडणाऱ्यांवर कारवाई कोण करणार? असा सवाल निर्माण होत आहे.

जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाच्या आदेशानंतर वेगळा आदेश देवून व्यापारी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तर अनेक जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा यांना सूट देण्यात आली आहे. परंतु याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे, मास्क, विनाकारण गर्दी करणे तसेच जिल्हा प्रशासनाने आणि शासनाने दिलेले आदेश मोडण्यावर कारवाई करण्यासाठी आदेश दिले आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या या कडक निर्बंधांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त, ना प्रशासनाची, ना कोरोनाची भीती बाळगत फिरत आहेत. या नागरिकांच्यावर किंवा व्यवसाय, अत्यावश्यक सेवांतील कोणाच्यावर कारवाई करण्यासाठी कोणीच दिसत नाही.

रस्त्यांवर केवळ गर्दी दिसत आहे. तेथे ना पोलिस, ना महसूल प्रशासन, ना पालिका प्रशासन, ना ग्रामपंचायत प्रशासन, ना प्रांताधिकारी, ना तहसिलदार, ना पोलिस अधिकारी, ना गटविकास अधिकारी, ना मुख्याधिकारी, ना तलाठी, ना ग्रामसेवक आहे, मग कारवाई कोणी करायची. कलेक्टर साहेब !

दवाखान्यात एका बाकावर पाचजण

अत्यावश्यक सेवेत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे ते म्हणजे वैद्यकीय सेवा. या वैद्यकीय सेवेतील खासगी व शासकीय दवाखान्यात कोणतेही कोरोनाचे नियम न पाळता गर्दीच गर्दी केली जात आहे. लस घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना सहा फूट अंतर ऐवजी एक फूट अंतरावर बसविले जात आहे. तर खासगी दवाखान्यात एका बाकावर चार ते पाच लोकांना बसण्यासाठी जागा दिली जात आहे. मग यांच्यावर कोणती कारवाई करणार आणि कोण?

बॅंकात आत नियम- बाहेर ?

अत्यावश्यक सेवेत असलेल्या बॅंकामध्ये शासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या उद्देशाने येणाऱ्या ग्राहकांना बॅंकेच्या दरवाजाच्या बाहेर रांगेमध्ये एकाचवेळी २५ ते ५० लोक उभे जात आहेत. काही बॅंकेमध्ये कोरोनाचा नियम काटेकोरपणे पाळला जात आहे. मात्र या बॅंकेच्या दरवाज्याबाहेर लोक कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता रांगेत उभे केले जात आहेत. मग यांच्यावर कोणती कारवाई करणार आणि कोण?

मेडिकलच्या बाहेर समोर गर्दीच- गर्दी

अत्यावश्यक सेवेत सर्वांत जास्त वेळ चालू असणारे मेडिकल हे आहे. मात्र याठिकाणीही मेडिकलच्या बाहेर काॅऊंटरसमोर ग्राहकांची गर्दीच- गर्दी असते. तेव्हा कोणतेही कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत. मग यांच्यावर कोणती कारवाई करणार आणि कोण?

बसमध्ये हम करे सो

शासनाच्या बसमध्ये ५० टक्के प्रवासी वाहतूकीस परवानगी आहे. तसेच खासगी बस- ट्रव्हल्समध्येही तोच नियम आहे. परंतु या मोठ्या वाहनांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. या वाहनांच्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी आजही नेले जात आहेत. मग यांच्यावर कोणती कारवाई करणार आणि कोण?

खासगी कार कोणच चेक करेना

स्वतः च्या चारचाकी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांना कोणीच कारवाई करताना दिसत नाही. चारचाकी वाहनांतून क्षमता चार प्रवाशांची असताना सहा ते आठ प्रवाशी नेले जात आहेत. त्यामुळे सध्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खासगी वाहने दिसून येत आहेत. तसेच मास्क लावले आहेत की नाही हे सुध्दा कोणी पाहत नसल्याचे दिसून येत आहे. मग यांच्यावर कोणती कारवाई करणार आणि कोण?

भाजी मार्केटला कोणी आवरं घालायचा

आज भाजी सर्वत्र मिळत असताना. लोक शहरातील मुख्य भाजी मंडईत मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी करत आहेत. एकाच ठिकाणी शेकडो लोक तेथे आलेले दिसत आहेत. अशावेळी शहरातील पालिका प्रशासन व त्यांचे कर्मचारी कुठे असतात हा संशोधनाचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे शहरातील भाजी मार्केटमधी या गर्दीला आवरं कोणी घालायचा हा प्रश्न मोठा आहे. तरीही कारवाई होताना दिसत नाही मग यांच्यावर कोणती कारवाई करणार आणि कोण?

वरदहस्त असणाऱ्या ठिकाणी

काही अत्यावश्यक सेवा किंवा खासगी ठिकाणांवरील गोष्टी काही पोलिस प्रशासनातील लोकांचा वरदहस्त आहे. काही हाॅटेल्स, आॅफिसेस, वाहन येथे काही राजकीय किंवा प्रशासनातील लोकांचा वरदहस्त आहे, तेथे कोरोनाचे सर्वच नियम पायदळी तुडवले जात आहेत. मग यांच्यावर कोणती कारवाई करणार आणि कोण?

शासकीय कार्यालयात बिनधास्त

कोरोनाचे नियम पाळावेत, नियमांचे उल्लघंन कोणी करत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगितले जाते. मात्र शासकीय कार्यालयात लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी अवस्था पहायला मिळत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचे कोणतेच नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. ना सॅनिटायझर, ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग अशी परिस्थिती पहायला मिळत आहे. शासकीय कार्यालयात बिनधास्त वावर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तेव्हा अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करणार आणि कोण?

पथक कुठे गायब ?

शासनाने व प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध पाळले जात आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी पथके कारवाई करतील असे सांगितले जात आहे. तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर नियम पायदळी तुडवले जात आहेत. दिवसेंन- दिवस कोरोनाचे रूग्ण जिल्ह्यात वाढत असताना कारवाई करणारी पथके कुठे गायब आहेत, हा संशोधनांचा मुद्दा बनला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांचा विचार करावा ः बाबुलाल लुनिया

तुम्ही दुकाने बंद करून कोरोना थांबणार नाही. बाजारपेठेत कोणतेही नियम पाळले जात नाही. कचेरीतच कोणतीच उपाययोजना काहीच राबविली नाही. तुम्ही निर्बंध घालून दुकाने चालू ठेवण्यास परवानगी द्यावी. आज सणांचे दिवस आहेत, परंतु आमचा कोणीच विचार करत नाहीत. गेले वर्ष कोरोनामुळे संकटात गेले आहे. आम्ही आता कामागारांचे पगार कसे करायचे? कामगारांना घरी बसायला सांगू का? बाहेरील जिल्ह्यात बाजारपेठ सुरू आहे, मग आमच्या सातारा जिल्ह्यातच आम्ही काय गुन्हा केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांचा विचार करणे गरजेचे आहे. अशी मागणी कराड तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबुलाल लुनिया यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group