औरंगाबाद – कोरोना वर लोक डाऊन मुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना मागील दीड वर्षांपासून पदवी अभ्यासक्रमाची बंद असलेली महाविद्यालयांची द्वारे अखेर आज उघडली. यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाविद्यालयात 50 टक्के क्षमतेने वर्ग भरविण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धत वापरण्यात आली. काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आले. आज पहिल्या दिवशी दुपारपर्यंत 35 ते 40 टक्के विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात हजेरी लावली होती.
राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आजपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे द्वारे उघडली. तत्पूर्वी महाविद्यालयात स्वच्छता करून सॅनिटायजेशन करण्यात आले. आज सकाळी महाविद्यालय उघडताच महाविद्यालयात कोरूना च्या दोन्ही लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच हजेरी लावली. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतली नाही त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात आले. तसेच पहिली लस घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि एक ही लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील ऑनलाइन वर्ग भरवण्यात आले. याशिवाय महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची थर्मल गन द्वारे तपासणी करून त्यांचे समुपदेशन ही करण्यात आले. महाविद्यालय परिसरात यावेळी सुरक्षित वातावरणात रहा, मास्क लावा, सॅनिटायझर चा वापर करा असे बॅनर लावून जनजागृती करण्यात आली.
कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेली महाविद्यालय आजपासून सुरू झाल्याने विद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आज पहिल्या दिवशी सुमारे 35 ते 40 टक्के विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात हजेरी लावली. एका वर्गात 50 टक्के विद्यार्थ्यांना बसविण्यात आले. तसेच दोन्ही लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच वर्गांमध्ये प्रवेश दिला गेला. आता दिवाळीनंतर काही विद्यार्थी महाविद्यालयात येतील अशी अपेक्षा महाविद्यालयांनी वर्तवली आहे.