सांगली । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्जाव्यतिरिक्त देण्यात येणारे सामान्य कर्ज पुन्हा वर्षभरानंतर देण्याबाबतचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ज्या सोसायट्यांची वसुली 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, त्यांना सामान्य कर्जाचा लाभ मिळणार असल्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी स्पष्ट केले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीने पावसाने द्राक्षबागा वाया गेल्या आहेत.
उध्वस्त झालेल्या बागायतदारांना दिलासा देण्यासाठी व्याजामध्ये सवलत देता येईल का? याबाबतचा लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष नाईक यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्हा बँकेच्या वतीने शेतकर्यांना पीक कर्जाशिवाय सामान्य कर्ज देण्यात येत होते. ज्या सोसायट्यांची वसुली शंभर टक्के आहे, त्यांना कर्ज देण्यात आले. परंतू विकास सोसायट्यांची थकबाकी वाढत गेल्याने गेल्या वर्षभरापासून ते बंद करण्यात आले होते.
शेतकर्यांची मागणी वाढत चालल्याने अखेर 80 टक्के वसुली असलेल्या सोसायट्यांना सामान्य कर्ज देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त झाला. द्राक्ष बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना सवलत देण्याची मागणी संचालकांनी केली. त्यानुसार बागायतदारांसाठी व्याजामध्ये सवलत देण्याचा विचार करण्यात येणार आहे, त्यासाठी समिती नियुक्त करुन माहिेती घेतली जाईल, त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.