सातारा | नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संवाद महत्वाचा असून त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. सुशासन सप्ताहनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेवेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
प्रशासनाची प्रतिमा सुधारण्यासाठी काम करणे महत्वाचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, प्रत्येकाने आपले काम व्यवस्थीत केल्यास यंत्रणेवरील व नागरिकांमधील ताण कमी होईल. स्थानिकस्तरावर नियमित प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. स्वत:च्या स्तरावर काम सोडविण्याची मानसिकता तयार करावी. आज आपण सुशासन सप्ताह साजरा करत आहे. असा सप्ताह साजरा करण्याची वेळ येऊ नये किंबहुना त्याची गरजही भासणार नाही अशा प्रकारे सर्वांनी काम करावे. नागरिकांच्या अडीअडचणी सोडविणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. याची जाण प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठेवावी. घालून दिलेल्या वेळेच्या बंधनामध्ये व नियमांमध्ये आपण उत्कृष्टपणे काम करु शकतो अनेक अधिकारी व कर्मचारी दाखवून देत आहेत. त्यांचा आदर्श घेवून सर्वांनीच काम ही आजची गरज आहे. असे काम करत असताना येणारे अनुभव व अडचणीबाबत चर्चा करा त्यातून सर्वांनाच सोयीचे असे काम करता येईल, असेही ते म्हणाले.
अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे म्हणाले, तळागाळातील पीडित व्यक्तीस वेळेवर न्याय देणे ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये जावून त्यांच्या संवाद साधणे गरजेचे आहे.
यावेळी प्रांताधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.