हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. मुंबई इंडियन्सच्या काही वरिष्ठ खेळाडूंनी हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेत. मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये गोंधळाची परिस्थिती असून त्याचे कारण हार्दिकची नेतृत्वशैली असल्याचे काही खेळाडूंनी टीम मॅनेजमेंटला सांगितलं. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. या बातमीमुळे मुंबई इंडियन्सच्या संघात सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हे नेतृत्वाचे संकट नाही तर गेल्या 10 वर्षांपासून रोहितच्या कर्णधारपदाची सवय असलेलय संघाला नव्या कॅप्टनच्या कार्यपद्धतीशी जुळवून घ्यायला वेळ लागतोय . फ्रँचायझी दरवर्षीप्रमाणेच या हंगामाचा आढावा घेईल आणि गरज पडल्यास संघाच्या भवितव्यावर निर्णय घेईल असेही एका अधिकाऱ्याने सांगितलं.
कोणी केली हार्दिकची तक्रार –
मुंबईच्या एका सामन्यानंतर खेळाडू आणि कोचिंग स्टाफची भेट झाली. यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहसारखे वरिष्ठ खेळाडू होते. या खेळाडूंनी टीमच्या खराब प्रदर्शनाची कारणे कोचिंग स्टाफसमोर ठेवली. या मीटिंगनंतर सिनिअर खेळाडूंशी स्वतंत्र चर्चा झाली. तिथेही याच गोष्टी समोर आल्या असं वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय सुमार राहिली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला हा संघ पॉईंट टेबल मध्ये खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत मुंबईने एकूण १२ सामने खेळले आहेत. त्यातील ४ सामन्यात विजय मिळवला असून ८ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. ५ वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या मुंबईला यंदा साजेशी कामगिरी करता आली नाही. हार्दिक पांड्याचे सुमार नेतृत्व मुंबईच्या पराभवाला कारणीभूत असल्याचे बोललं जात आहे.