हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्टँड-अप कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैना (Samay Raina) आपल्या विनोदीवृत्तीसाठी जगभरात ओळखला जातो. सध्या त्याचा शो “India’s Got Latent” हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. मात्र, आता याच शोमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अरुणाचल प्रदेशबाबत एका स्पर्धकाने केलेल्या विधानामुळे शोविरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
समय रैना होस्ट करत असलेल्या “India’s Got Latent” या शोमध्ये अरुणाचल प्रदेशातील जेस्सी नवाम नावाच्या तरुणीने सहभाग घेतला होता. शोदरम्यान सुरू असलेल्या संवादाच्या ओघात समय रैनाने तिला विचारले की, “तू कुत्र्याचे मांस खाल्ले आहेस का?” यावर उत्तर देताना नवाम म्हणाली की, “मी अजून खाल्लेले नाही, पण अरुणाचल प्रदेशातील लोक कुत्र्याचे मांस खातात.” तिने पुढे तिच्या काही मित्रांचा संदर्भ देत ते हे मांस खात असल्याचं सांगितलं.
या वक्तव्या वरूनच आता मोठा वाद निर्माण झाला आहे. अरुणाचल प्रदेशातील स्थानिक नागरिकांनी या विधानाचा निषेध केला आहे. त्यांनी आरोप लावला आहे की, या वक्तव्यामुळे अरुणाचल प्रदेशाच्या लोकांची बदनामी झाली आहे आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले आहे.
शोविरोधात गुन्हा दाखल
महत्वाचे म्हणजे, अरुणाचल प्रदेशातील अरमान राम वेली बाखा या नागरिकाने ईटानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “जेस्सी नवाम हिने अरुणाचल प्रदेशच्या लोकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे आणि त्यामुळे स्थानिकांच्या भावना दुखावल्या आहेत.” पोलिसांनी तक्रारीची दखल घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तक्रारदाराने मागणी केली आहे की, भविष्यात असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
दरम्यान, हा वाद पेटल्यानंतर सोशल मीडियावर समय रैना आणि जेस्सी नवाम यांच्यावर टीका केली जात आहे. अनेकांनी शोमधील संबंधित भाग हटवण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप India’s Got Latent या शोच्या कोणत्याही पॅनेलिस्टने किंवा समय रैनाने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र दुसऱ्या बाजूला, या वादामुळे दोन गट पडले आहेत. काहींनी या वक्तव्याचे समर्थन केले आहे तर काहींनी जोरदार टीका केली आहे.