शिरवळ | खंडाळा तालुक्यातील वडवाडी येथे अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या जागेत 100 बेडचे कोरोना केअर सेंटरची स्थानिक कंपन्यांच्या फंडातून उभारणीचे ऑगस्टमध्ये उभारले गेले अन् त्याचे उद्घाटन करण्यात आले. परंतु दुसऱ्या लाटेत कोरोना सेंटरचे काहीच अस्तित्व दिसत नसल्याने कोरोना सेंटर चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करा, असे निवेदन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस अनुप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिरवळचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांना देण्यात आले.
या वेळी भाजपचे शहराध्यक्ष नीलकंठ भूतकर, इम्रान काझी,अजिंक्य कांबळे, हितेश जाधव आणि रोहित देशमुख उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे, की वडवाडी येथील कोरोना सेंटर चोरीला गेल्याची फिर्याद दाखल करण्यात यावी. या सेंटरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते. नीरा व्हॅली असोसिएशन व प्रशासन यांच्या वतीने हे सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र, आजतागायत हे सेंटर वापरण्यात आले नाही. या संदर्भात प्रशासनाकडे चौकशी केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
वडवाडी येथील सेंटरच्या जागेवर कार्यकर्त्यांच्या समवेत जाऊन आल्यानंतर या ठिकाणी सेंटरच अस्तित्वात नाही. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे रुग्णांना उपयोगात आले असते. मात्र, दुर्दैवाने सेंटर अस्तित्वात नसल्याने सध्या रुग्णांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा प्रकार गंभीर असून, आम्ही या निवेदनाद्वारे सेंटर चोरीला गेल्याची फिर्याद दाखल करून संबंधित प्रकारची सखोल चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.