Sunday, June 4, 2023

नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा – डॉ. कराड

औरंगाबाद – नागरिकांना वेठीस धरू नका, पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना सुनावले.

राज्य शासनाने मंजूर केलेल्या 1680 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी जायकवाडी धरणातील जॅकवेलसंदर्भात वन्यजीव विभागाकडून परवानगीचा तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने यासंदर्भात कारवाई करणे आवश्यक आहे.

पैठण रस्त्याचे रुंदीकरण हे राष्ट्रीय महामार्ग राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून होत आहे. त्यानुसार परवानगीही मिळाली आहे. कंपनीने पाईप निर्धारित वेळेत तयार करावे म्हणजे, मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होईल. योजनेचे काम लवकर पूर्ण करावे, अन्यथा नागरिक पाण्याच्या प्रश्‍नावर आक्रमक होतील, असे डॉ. कराड यांनी सांगितले. बैठकीला माजी महापौर भगवान घडमोडे, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजयसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे, कंत्राटदाराचे प्रतिनिधी अभिषेक जाधव उपस्थिती होते.