सातारा | जुन्या दस्तांवर मुद्रांक शुल्क भरुन घेण्यासाठी त्यावरील येणाऱ्या दंडाबाबत दंडसवलत अभय योजना – 2022 ही योजना 1 एप्रिल 2022 पासून लागू केली आहे. दि. 31 मार्च 2022 पर्यंत नोटीस निर्गमित केलेल्या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 31, 32(अ), 33, 46, 53(1अ), 53(अ) अंतर्गत मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व त्यांचे अधिनस्त असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रलंबित प्रकरणातील कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कावरील दंड सवलतीसाठी लागू असेल. तरी या मुद्रांक शुल्क दंडसवलत अभय योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बी. के. खांडेकर यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत दिनांक 01 एप्रिल 2022 ते दिनांक 30 सप्टेंबर 2022 आहे. पहिल्या टप्यामध्ये दिनांक 01 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 कालावधीकरिता दंड सवलत 90% (दंड रकमेच्या) व दुस-या टप्यामध्ये दिनांक 01 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 कालावधीकरिता दंड सवलत 50% (दंड रकमेच्या) इतकी आहे. ही योजना महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 31, 32(अ), 33, 46, 53(1अ), 53(अ) या कलमानुसार सक्षम अधिकारी यांनी दि. 31 मार्च 2022 पूर्वी ज्या प्रकरणात दंड वसूलीबाबत पक्षकारास, दस्त निष्पादकास किमान एक तरी नोटीस बजावलेली आहे, अशा सर्व प्रकरणांना लागू राहील.
उच्च व सर्वेाच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे प्रलंबित न्यायप्रविष्ट प्रकरणांनाही मुद्रांक शुल्क दंड सवलत अभय योजना लागू राहील. त्यासाठी संबंधितांना न्यायप्रविष्ट प्रकरण बिनाशर्त मागे घ्यावे लागेल व तसे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. दिनांक 01 एप्रिल 2022 रोजी किंवा त्यानंतर दाखल होणा-या नवीन प्रकरणांना ही अभय योजना लागू राहणार नाही.
अभय योजना- 2022 मध्ये दाखल प्रकरणांच्या बाबतीत मुद्रांक शुल्क निश्चित करण्याची कोणतीही नविन प्रक्रीया अवलंबली जाणार नाही. अर्जदार यांना पुर्वी घेण्यात आलेला निर्णय मान्य करावा लागेल. मुळ मुद्रांक शुल्क शासन जमा केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या दंडामध्ये सवलत मिळेल. मुळ मुद्रांक शुल्कामध्ये कोणतीही सुट अथवा सवलत मिळणार नाही. मुळ मुद्रांक शुल्क व दंड शासन जमा केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा परतावा मागता येणार नाही, मिळणार नाही.
अर्जदार यांना अपील, रिट पिटीशनद्वारे न्यायालयात दाद मागता येणार नाही. या योजनेचा लाभ घेण्याकरीता अर्जाचा नमुना सह जिल्हा निबंधक वर्ग-1 सातारा यांचे कार्यालयात उपलब्ध असून या अभय योजनेचा लाभ संबंधित नागरिकांनी घ्यावा. असे आवाहनही श्री. खांडेकर यांनी केले आहे. या योजनेची माहिती विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रकाशने परिपत्रक मुद्रांक अभय योजना या सदराखाली अभय योजना -2022 दि. 01 एप्रिल 2022 रोजीचा शासन आदेश पाहण्यास उपलब्ध आहे.