महाविकास आघाडीचा एल्गार ; महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ‘या’ ठिकाणी होणार जाहीर सभा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांना आव्हान देण्यासाठी व केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे त्यांनी आता महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आघाडीची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षासह डाव्या आणि पुरोगामी पक्ष संघटना देखील उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण राज्याचे राज ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या सभेकडे लक्ष लागले आहे.

आघाडीच्या या सभेची तारीखही राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठेवण्यात आली आहे. 30 एप्रिल रोजी पुणे येथील अलका टॉकीज चौकात आयोजित करण्यात आलेल्या सभेला सद्भावना निर्धार सभा असे म्हंटले आहे. देशासह महाराष्ट्रातील इंधन दरवाढ, महागाई तसेच राज्यात वाढणाऱ्या धर्मांध सत्तेच्या विरोधात ही सभा घेतली जाणार आहे. या सभेला महा विकास आघाडी सरकारमधील महत्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हंटले आहे.

सलग तीन दिवस सभांचा धडाका –

एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेतून राज ठाकरे महाविकास आघाडीवर निशाणा साधणार आहेत. तर, दुसरीकडे याच दिवशी मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईत अतिविराट सभा घेतली आहे. भाजपने या सभेला बुस्टर डोस सभा असे टायटल दिले आहे. या सभेतून शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची पोलखोल करण्यात येणार असल्याची चर्चा केली जात आहे. तर महाविकास आघाडीची पुण्यात सद्भावना निर्धार सभा होणार आहे. या तिन्ही सभांतून काय नवीन टीका टिपण्णी केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.