हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवरात्रोत्सवास आजपासून थाटात प्रारंभ झाला. या दिवशी घटस्थापना केली जाते. साडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचे पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आज सकाळी तोफेची सलामी देऊन घटस्थापना करण्यात आली आहे. प्रत्येकवेळी कोल्हापुरात तोफेच्या सलामीनंतर करवीर नगरीत नवरात्रोत्सवाला सुरवात होते.
राज्य सरकारने कोरोनापासून बंद ठेवलेली मंदिरे आजपासून खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आज नवरात्रोस्तवाच्या सुरुवातीलाच राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली. कोल्हापुरातही नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुहूर्ताने अंबाबाई मंदिरात घटस्थापना करण्यात आली. मंदिरात घटस्थापना झाल्याचा संदेश करवीरवासियांना मिळावा यासाठी तोफेची सलामी देण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जपली जाते. अंबाबाई मंदिरातील या तोफेच्या सलामीने नंतरच भाविक आपल्या घरांमध्ये घटाची स्थापना करत असतात.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर नवरात्र उत्सवानिमित्त विविधरंगी नेत्रदीपक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. कोरोनामुळे तब्बल सहा महिने बंद असणारी मंदिरे घटस्थापना दिवशी खुली होत आहेत. त्यामुळे भाविकांना ही रोषणाई जवळून पाहायला मिळणार आहे. आज पहाटे पाच वाजता महालक्ष्मीचे मंदिर उघडण्यात आले. ‘अंबा माता की जय’ असा गजर करीत भाविकांनी मंदिरात प्रवेश केला. प्रथम काकड आरती झाली. मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. ई -पास असलेल्या भाविकांना दर्शनासाठी मुभा होती. भाविकांनी ऑनलाईन नोंदणी मोठ्या प्रमाणात केली आहे.
यावेळी मंदिरात फुलांची विशेष सजावट करण्यात आले आहे. विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले आहे. यामुळे मंदिराच्या मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. भाविकांनी करोना नियमाचे पालन करीत दर्शन करावे, असे आवाहन देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी केले आहे. ई-पास नसलेले अन्य भाविक महाद्वार रस्त्याकडील बाजूने मुखदर्शन घेत आहेत. पहिल्या दिवशी भाविकांनी शिस्तीचे पालन केले.
यावर्षी प्रथेप्रमाणे मंदिर समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी ही तोफ दिली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास मंदिराच्या प्रवेशद्वारावर तोफेने सलामी देण्यात आली. त्यानंतर मंदिर समितीच्यावतीने मंदिरात घटस्थापना करण्यात आली. तोफेच्या सलामीचा आवाज ऐकल्यानंतर व मंदिरात घटस्थापना करण्यात आल्यानंतर कोल्हापूरकरांनी घटस्थापना केली.