कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंधकर
कोरोना या साथीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे दि. 21 व 22 मार्च रोजी होणारी परिषद पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
21 व 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद भरली होती. ही परिषद छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने भरली होती . या परिषदेचे अध्यक्षस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषवले होते. या ऐतिहासिक परिषदेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने यावर्षी भव्य माणगाव परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने स्वीकारली होती.
या परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेची जय्यत तयारीही
करण्यात येत होती.
मात्र राज्यात व एकंदर देशातच निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे कार्यक्रम टाळण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. माणगाव येथील या ऐतिहासिक परिषदेस जमणारी मोठी गर्दी व कोरोनाचा संभाव्य धोका पाहता ही परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आज याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही चर्चा झाली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर माणगाव परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.