नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तो राजीनामा काँग्रेस कार्य समितीने मंजूर नकरता एक महिना हा पेच सोडण्यासाठी राहुल गांधी यांना पदावर कायम राहण्याची विनंती केली. ती विनंती राहुल गांधी यांनी मान्य देखील केली. मात्र आता पक्षाने नवीन फतवा काढून सर्व राज्यांच्या काँग्रेस समित्या बारकास्त केल्या आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणा या महत्वाच्या राज्यात विधानसभा निवडणुका होत असल्याने काँग्रेसला या समित्यांची निवड तातडीने करणे गरजेचे असणार आहे.
राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असून त्यांच्या जागी अध्यक्ष म्हणून कोणाला नेमले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राहुल गांधी यांच्या जागी कोणाची नेमणूक करायची या काँग्रेस पक्षापुढे पडलेला मोठा पेच आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी मल्लिकार्जुन खरगे , सुशीलकुमार शिंदे , राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची नावे चर्चेत आहेत. मात्र अशोक गेहलोत यांच्या मुख्यमंत्री पदाचा बळी देऊन त्यांच्या गळ्यात अवजड अशी अध्यक्ष पदाची माळ टाकण्याचे काँग्रेसच्या मनात भरले आहे.
दरम्यान राहुल गांधी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर सामान्य जनतेत जाणार आहेत. लोकांमध्ये राहून काँग्रेसची प्रतिमा लोकांमध्ये उंचावण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर काही राजकीय पंडित असा देखील अंदाज लावत आहेत कि राहुल गांधी एक वर्षानंतर पुन्हा एकदा अध्यक्ष पदावर विरजमान होण्याची शक्यता आहे.