हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच अशोक चव्हाण यांचे हे विधान नक्की कोणासाठी आणि कशासाठी आहे यावर आता तर्क वितर्क लढवले जात आहे.
अशोक चव्हाण हे भोकरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम उत्तम सुरु आहे. मला आघाडीत बिघाडी करायची नाही. त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाण यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय काढायचा,असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
जयंत पाटील नक्की काय म्हणाले?
दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र सध्या आमच्या पक्षाकडे ते पद नाही. प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवावी लागेल. त्यानंतर पक्ष आणि खासदार शरद पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं आपण म्हटल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’