आघाडीत ठिणगी! औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याला आमचा विरोध – बाळासाहेब थोरात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । औरंगाबादचं नाव बदलून ते संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु असताना आता महाविकास आघाडीतील घटक असलेल्या कॉंग्रेसने याला विरोध केला आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये नाव बदलण्याचा समावेश नसल्याचं कॉंग्रेसनं स्पष्ट केलंय. काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी या नामांतरणाला विरोध करताना म्हटलं की, “संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारनं सामान्य माणसाचं जीवन सुखी कसं होईल हे पाहायचं, हा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या मुख्य हेतू आहे .महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये अशाप्रकारे शहरांचं नाव बदलण्याचं ठरलेलं नाही.”

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, “नाव बदलण्याचा हा अजेंडा आम्हाला मान्य नाही .नाव बदलावर काँग्रेसचा विश्वास नाही. शहराच्या नावात बदल करुन काही होत नाही, काही गोष्टींचा इतिहास बदलू शकत नाही. आम्ही विकासाची वाटचाल सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून करत आहोत, हे आमचे सूत्र आहे आणि हे राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांना धरुन आहे. शहराच्या नावात बदल करणे ही गोष्ट आम्हाला मान्यच नाही. या प्रस्तावाला निश्चितच आमचा विरोध राहणार.”

दरम्यान, औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात येईल. केंद्राच्या मंजुरीनंतर नव्या नावावर शिक्कामोर्तब होईल. आता लवकरच शिवसेनेचं स्वप्न सत्यात येणार असल्याचं दिसत असताना महाआघाडीतील प्रमुख घटक कॉंग्रेसने या नामांतरणाला विरोध केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment