काँग्रेसला मोठा हादरा बसणार; माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या वाटेवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काँग्रेस (Congrees) पक्षाला महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशमध्ये देखील मोठा झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वृत्त समोर आले आहे की, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) भाजपच्या वाटेवर आहेत. लवकर ते भाजपमध्ये प्रवेश करतील. आता कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ याने आपल्या एक्स अकाउंटवरून काँग्रेस पक्षाचे नाव हटवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेता वीडी शर्मा (V. D. Sharma) यांनी एक मोठे विधान केले आहे. “काँग्रेसमधील अडचणीत असलेल्या नेत्यांसाठी आमचे दरवाजे सदैव खुले आहेत” असे शर्मा यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, अयोध्येतील रामलल्ला यांच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ कार्यक्रमाचे निमंत्रण हायकमांडने नाकारल्याने काँग्रेसचे अनेक नेते नाराज असल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे. तसेच, “राजकारणाच्या माध्यमातून ज्या लोकांना वाटते की आपल्या देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी करावे त्यांच्यासाठी आमचे दरवाजे सदैव उघडे आहेत. काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत, ज्यांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर काँग्रेस ज्येष्ठांनी बहिष्कार टाकलेले आवडलेले नाही. काँग्रेस पक्ष श्रीराम यांचा अपमान करते. जर कमलनाथ यांना याविषयी वाईट वाटत असेल तर त्यांचे भाजपमध्ये स्वागत आहे”

काँग्रेसवर टीका

त्याचबरोबर, ” आजवर लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम काँग्रेसने केले आहे. CBI आणि IB सारखी कोणतीही संस्था लोकशाहीचे घटनात्मक अधिकार घेऊनच काम करते. आता देशात काँग्रेसचे अस्तित्व उरलेले नाही. त्यामुळे ती केवळ आरोप-प्रत्यारोपांपुरतीच करत आहे” असे टीका शर्मा यांनी काँग्रेसवर केली आहे. पुढे बोलताना, “पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे यावेळी एनडीए 400 हून अधिक जागांसह दणदणीत विजय मिळवेल” असा दावा ही शर्मा यांनी केला आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये आज प्रवेश करतील असे म्हटले जात आहे. त्यांच्यासह काँग्रेसचे इतर दहा आमदार आणि तीन महापौर देखील भाजपमध्ये जातील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. इतकेच नव्हे तर कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथही भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. असे झाल्यास याचा मोठा धक्का काँग्रेसला बसलं.