हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा रंगत आहे. त्यात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव अग्रस्थानी होते. दरम्यान आज नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नाना पाटोळे हेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असणाऱ्या नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. दिल्लीतील 10 जनपथ या राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या भेटीनंतर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीच्या आणखी एक पाऊल जवळ पोहोचल्याचे बोलले जात होतं.
नाना पटोलेंचे नाव का आघाडीवर?
नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’