नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) टूलकिट प्रकरणी कारवाई केली आहे. बंगळुरू येथील पर्यावरवादी कार्यकर्ती दिशा रवी (वय २२) या तरुणीला अटक केली आहे. फ्रायडे फॉर फ्युचर कॅपेनची दिशा ही एक संस्थापक सदस्य आहे. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी दिशा रवीच्या (Disha Ravi) अटकेचा विरोध केला आहे. ”भारत मूर्खपणाची रंगभूमी बनत चालला आहे” अशा शब्दांत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
पी. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “जर २२ वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठीचं एक टूलकिट भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांपेक्षाही धोकादायक झालं आहे” असं पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच तरुणांना हुकूमशाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
“भारत एक मूर्खपणाची रंगभूमी बनत आहे”
“भारत एक मूर्खपणाची रंगभूमी बनत आहे आणि दिल्ली पोलीस अत्याचाऱ्यांचे साधन बनले आहेत, ही खेदाची बाब आहे. मी दिशा रवीच्या अटकेचा तीव्र निषेध करतो आणि सर्व विद्यार्थी आणि तरुणांना हुकूमशाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करतो” असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
भारत बेतुका रंगमंच बन रहा है और यह दुखद है कि दिल्ली पुलिस उत्पीड़कों का औजार बन गई है।
मैं दिशा रवि की गिरफ्तारी की कड़ी निंदा करता हूं और सभी छात्रों और युवाओं से आग्रह करता हूं कि वे निरंकुश शासन के खिलाफ आवाज उठाएं।— P. Chidambaram (@PChidambaram_IN) February 14, 2021
काय आहे टूलकिट प्रकरण
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासह इंटरनेट सेवा बंद केली होती. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गने एक टूलकिट ट्विट केले होते. मात्र, काही वेळानंतर ते डिलीट करण्यात आली.
ग्रेटा थनबर्गने शेअर केलेल्या टूलकिटच्या माध्यमातून देशातील वातावरण बिघडवण्याचा कट रचला जातोय, भारत सरकारची प्रतिमा खराब करण्याचा डाव आहे असा आरोप करत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कलम 124 ए (राजद्रोह), 153 ए, 153 आणि 120 बी अंतर्गत फिर्याद दाखल केली. या गुन्ह्यामध्ये ग्रेटाचे नाव लिहिलेले नाही, पण तिच्या ट्विट आणि टूलकिटवर गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास करत सुरु असल्याचं दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने स्पष्ट केलं आहे.
हे टूलकीट खलिस्तानी समर्थकांनी तयार केलं आहे. त्याचा उद्देश हा शेतकरी आंदोलनाच्या आड देशात सामाजिक तणाव वाढवण्याचा असल्याचं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे. ४ फेब्रुवारी रोजी ट्विटर टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर आता खलिस्तानी फुटीरतावाद्यांना उभारी देण्यासाठी आणि भारत सरकारविरूद्ध हा मोठा कट रचणाऱ्या ‘टूलकिट प्रकरणी’ गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी २२ वर्षांच्या दिशा रवी हिला अटक केली आहे. ती टूलकिट गुगल डॉकच्या संपादन करणाऱ्यांत आणि ती व्हायरल करण्याच्या कटात सामील होती, असा आरोप दिल्ली पोलिसांकडून दिशाविरोधात करण्यात आला आहे. तर ‘मी टूलकिटमधील फक्त दोनच ओळी संपादित केल्या आहेत. मी हे फक्त शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केले. अन्नदात्यांच्या आंदोलनाने मी प्रभावीत होऊन ग्रेटाचं ट्विट रिट्विट केल्याचं’ स्पष्टीकरण दिशा रवी हिने न्यायालयासमोर दिलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.