.. म्हणून राहुल गांधींनी मोदी सरकारला करुन दिली ५ महिन्यापूर्वी दिलेल्या ‘त्या’ इशाऱ्याची आठवण

नवी दिल्ली । नोटबंदी, जीएसटी, लॉकडाउनच्या निर्णयांवरून मोदी सरकारवर सातत्यानं टीका करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशावर ओढवू शकणाऱ्या आर्थिक संकटाविषयी आधीच सरकारला इशारा दिला होता. मार्च २०१७ रोजी राहुल गांधी यांनी येऊ घातलेल्या आर्थिक संकटाविषयी भाष्य केलं होतं. आर्थिक संकटाविषयी सर्तक करणारा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. त्याचबरोबर “जीडीपी २४ टक्क्यांनी कोसळला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. प्रत्येक इशाऱ्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जाणं खूप दुर्दैवी आहे,” असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, भारताचा जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट झालं. तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून, एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही आहे.

कोरोना संकटाविषयीही राहुल गांधींनी केलं होतं सावध
चीननंतर इतर देशात करोनाचा प्रसार सुरू झाला असताना राहुल गांधींनी यासंदर्भात मोदी सरकारला सावध केलं होतं. करोनाचं संकट गंभीर असल्याचं त्यांनी मोदी सरकारला सांगितलं होतं. राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी रोजी ट्विट करून केंद्र सरकारला सावध होण्याचा इशारा दिला होता. ‘भारतातील लोकांसाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी करोना गंभीर धोका आहे. मला असं वाटत की, केंद्र सरकार हा धोका गांभीर्यानं घेतना दिसत नाही. वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे आहे,’ असा इशारा राहुल गांधींनी दिला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like