कराड | तांबवे गावचा स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास हा ज्वाज्यल्य आहे. आपल्या गावचा इतिहास हा पुढील पिढीला माहिती असणे आवश्यक आहे. तांबवे गावात 9 आॅगस्ट या दिवशी इतिहास घडविला गेला. परंतु आताच्या पिढीला त्यांची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेल्या तांबवे गावात काॅंग्रेसची देशभरात निघालेली पदयात्रा आलेली आहे. तरूणांनी तांबवे गावचा इतिहास जपण्यासाठी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा काॅंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेल्या तांबवे (ता. कराड) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त काँग्रेस पक्षाकडून ऑगस्ट क्रांती दिनी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तांबवे गावातून पदयात्रा काढण्यात आली. तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. या यात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक सदस्य प्रदिप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सरपंच शोभाताई शिंदे, कोयना बॅंकेचे संचालक अविनाश पाटील आदी उपस्थितीत होते.
यावेळी उदयसिंह पाटील म्हणाले, तांबवे गावात इंग्रजांना देशातून पळवून लावण्यासाठी मोठा संघर्ष उभा केला होता. त्यामुळेच प्रत्येक घरात स्वातंत्र्य सैनिक होते. आजही या गावाला एक वेगळा इतिहास आहे. काॅंग्रेसने सुरू केलेली पदयात्रा ही पक्षाची नसून देशाच्या स्वातंत्र्यात आपले बलिदान देणाऱ्या सैनिकाचे कार्य सांगणारी आहे. 9 आॅगस्ट या दिवशी नक्की काय घडले, त्याचा इतिहास संपूर्ण देशाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सांगण्याचा प्रयत्न आहे. यावेळी सतिश यादव यांनी सूत्रसंचालन केले.