हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे महाराष्ट्र संकटात आहे. त्यातच राज्य सरकारने नागरिकांना मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर ताण पडणार असून याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील काँग्रेसचे सर्व आमदार त्यांचं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडेल. तो कमी व्हावा या हेतूनं राज्यातील काँग्रेसचे आमदार त्यांचं १ महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देतील,’ असं थोरात म्हणाले. बाळासाहेब थोरात त्यांचं एका वर्षाचं संपूर्ण वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार आहेत. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिली जाणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली.
दरम्यान, देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. मात्र राज्यात मात्र लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यानं १ मेपासून राज्यात लसीकरण सुरु होणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं. राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील ५ कोटी ७१ लाख लोकसंख्या असून, या सर्वांचे मोफत लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.