हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राज्यचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाण साधला आहे. भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते आता भाजप पाल झाले आहेत अशी खरमरीत टीका नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी आज विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तीन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’ पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या, अश्या शब्दात म नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारींवर जोरदार हल्लाबोल केला आहे
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल महोदयांना भेटून विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत कळवण्यातही आलेले आहे. परंतु अद्याप राजभवनवरून याबाबत कोणताही प्रतिसाद आलेला नाही. आघाडीतील तीन्ही पक्षांनी याविषयी चर्चा केली आहे. सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून राज्यपाल महोदयांना पुन्हा याबाबत संदेश दिला जाईल. आमचा उमेदवार निश्चित झालेला आहे. एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरु झाली की नावही जाहीर करू, असे नाना पटोलेंनी सांगितले.