हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना मित्रपक्ष काँग्रेसला त्यांच्या स्वबळाच्या भाषेवर कानपिचक्या दिल्या. तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा अप्रत्यक्षपणे इशारा त्यांनी काँग्रेसला दिला. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी यावेळी मात्र सावध प्रतिक्रिया दिली.
नाना पटोले म्हणाले, “स्वबळाची भाषा जसे आम्ही करतो तसे भाजपवाले पण करतात. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाला बोलले ते समजलं नाही. आम्ही कोरोना काळात जनतेच्या सेवेत होतो. त्यामुळे आम्हाला जनतेने जोडे मारण्याचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता. ते पक्षप्रमुख म्हणून बोलले. त्यामुळे ते असं वाक्य बोलले असतील. जर हे काँग्रेसबाबत बोलल्याचे स्पष्ट झाले तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असे नाना पटोले यांनी म्हंटल.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले –
अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा अप्रत्यक्षपणे इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिला आहे.