पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात अटक झालेले बहुसंख्य लोक भाजपचे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पालघरमधील मॉब लिंचिंगच्या घटनेवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणी भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात गुरुवारी रात्री झालेल्या साधूंच्या हत्याकांडावरून भाजपने रान उठवलं असताना सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. पालघरच्या घटनेवरून भाजप धार्मिक राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करत आहे. प्रत्यक्षात या प्रकरणात अटक झालेले बहुसंख्य लोक भाजपचे आहेत, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे.

पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येच्या घटनेवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर दोषारोप सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘मॉब लिंचिंगचे केंद्र असलेल्या यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करणं हा शहाजोगपणा आहे. खरंतर गडचिंचले ग्रुप ग्रामपंचायत हा भाजपचा बालेकिल्ला असून तिथं गेली १० वर्षे भाजपचा सरंपच आहे. सध्या भाजपच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत. लिंचिंगच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुसंख्य भाजपचे लोक आहेत, असं सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

‘पालघरमध्ये चोरांच्या अफवेबरोबरच एक अफवा होती की काही मुस्लिम वेशांतर करून मुले पळवून किडनी काढतात वा विहिरीत थुंकून करोना पसरवतात. अशा अफवांनी समाजाला हिंसक बनवण्याचे कारस्थान देशात आजवर कोण करतय? साधूंचा वेश पाहूनही मॉब थांबत नाही हे भयानक आहे. या अफवांमागे कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे’,अशी मागणी सावंत यांनी केली आहे. ‘गेली ५ वर्षे भाजप सत्तेत असताना धुळ्यात झालेली वा वर्षभरापूर्वी पालघरलाच झालेल्या किंवा राज्यातील अन्य घटनांना पायबंद घालू न शकणारे आज यावर राजकारण करत आहेत हे गंभीर आहे,’ असा संतापही सावंत यांनी व्यक्त केला आहे.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”