हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसच्या (Congress) ताब्यात आले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता काँग्रेसने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी ही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद ही काँग्रेसकडे जाईल का? हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्याकडे आहे. यामुळे जर हे पद काँग्रेसच्या ताब्यात गेले याचा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये सतेज पाटील, राजेश राठोड आणि अभिजित वंजारी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मुख्य म्हणजे, संख्याबळाच्या जोरावर परिषदेतील विरोधी पक्षनेते पद आपल्या ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस पक्षातील आमदारांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठविले आहे. या पत्रावर विधानपरिषदेच्या 9 पैकी 6 आमदारांच्या सह्या आहेत. नागपूरचे अॅड. अभिजित वंजारी, प्रज्ञा सातव, वजाहत मिर्झा, राजेश राठोड, धीरज लिंगाडे, सुधाकर अडबाले या सर्वांनी पत्रावर सह्या केल्या आहेत. अद्याप मल्लिकार्जुन खरगे यांनी या पत्राबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही.
कोणाकडे किती संख्या –
राज्यात पक्षांमध्ये पडलेल्या अंतर्गत फुटीनंतर विधान परिषदेत सध्या शरद पवार गटाच्या 4, काँग्रेसच्या 9, अजित पवारांच्या 5, उद्धव ठाकरे गटाच्या 8, एकनाथ शिंदे गटाच्या 3 जागा आहेत. मध्यंतरीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंद करत शिंदे फडणवीस सरकारशी हात मिळवणे केली. यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे जास्त संख्याबळामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे आले आहे. आता काँग्रेस विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद ही बळकावण्याच्या तयारीत आहे. यामुळे शिवसेनेचे विरोधी पदनेते अंबादास दानवे यांचे पद धोक्यात आले आहे.