औरंगाबाद | औरंगाबादच्या पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप सदस्यांत नुकत्याच झालेल्या उपसभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच भाजप कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हटवल्याने राडा झाला. कॉंग्रेस सोडून भाजपत प्रवेश करत पंचायत समितीचे उपसभापती पद मिळवणाऱ्या अर्जुन शेळके यांना त्यांच्या दालनात मारहाण झाल्याची घटना आज दुपारी घडली. कॉंग्रेसच्या दोन पंचायत समिती सदस्यांसह सात ते आठ कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याची माहिती माजी विधानसभा अध्यक्ष भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/511464719921813/
याविषयी अधिक माहिती अशी की, अर्जुन शेळके यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर ४ दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत केवळ एका मताच्या फरकाने उपसभापती म्हणून शेळके निवडून आले. यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. २९ जुलैला रोजी औरंगाबाद पंचायत समितीच्या कार्यालयात झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अनुराग शिंदे यांना ९ मते तर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्जुन शेळके यांना १० मते मिळाली. यानंतर सोमवारी दुपारी नूतन उपसभापती अर्जुन शेळके यांच्या दालनात कॉंग्रेसचे दोन सदस्य आणि सात ते आठ जण आले.
बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा का हटवली म्हणत अचानक त्यांनी शेळके यांच्यावर हल्ला केला. दालनातील खुर्च्या-टेबलची तोडफोड केली. दालनाच्या खिडक्यांची तोडफोड केली. यात शेळके यांच्या डोक्याला मार लागला आहे.