ट्रॅक्टरमधून प्रवास ते पुरग्रस्तांसोबत जेवण; पृथ्वीराजबाबांनी केलं नागरिकांचे सांत्वन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड व पाटण तालुक्यातील अनेक गावांना आठवडाभर पडलेल्या पावसाच्या महापूराचा फटका बसलेला आहे. काल पाटण तालुक्यातील दुर्घटनेतील गावांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट देवून पूरग्रस्तां बरोबर जेवण केले होते. तर आज गुरूवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ट्रक्टरमधून प्रवास करत नुकसानग्रस्त लोकांची भेट घेवून जेवण केले आहे.

कराड तालुक्यातील कराड दक्षिण मतदार संघात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे, रस्त्यांचे तसेच लोकांच्या घरांचे मोठे नुकसान जाले आहे. या मतदार संघाचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवसभरात लोकांची भेट घेवून नुकसानीची पाहणी केली. यावेळी बांदेकरवाडी येथे पुराच्या पाण्यामुळे अनेक रस्ते खचले आहेत. सवादे – बांदेकरवाडी पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद होता अशा परिस्थितीत बांदेकरवाडी येथील परिस्थिती पाहण्यासाठी व ग्रामस्थांना आधार देण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्रॅक्टर मधून जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांच्या आग्रहावरून गावातील हनुमान मंदिरात ग्रामस्थांच्या सोबत पृथ्वीराज चव्हाण यांनी जेवण केले.

कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी जेवण केल्यानंतर काल देवेंद्र फडणवीस यांनीही पूरग्रस्तांसोबत जेवण केल्याची चर्चा रंगू लागल्या. तर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी पाटण तालुक्यातील मोरगिरी- आंबेघर येथे भूस्खलन झालेल्या दुर्घटनेतील बाधितांची भेट घेवून जेवण केल्याचे फोटो व व्हिडिअो ट्विट होत आहेत. तर महाविकास आघाडी सरकारलाही भाजपाकडून टोला लगावला जात होता. मात्र आता पृथ्वीराज चव्हाण यांचे फोटो व्हायरल होत असून भाजपाला आता या फोटोवरून सडेतोड उत्तर दिले जावू लागले आहे.